संतोष पवार
पळसदेव : शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळ आणि श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा वाघ पॅलेस इंदापूर येथे संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील 101 माध्यमिक शाळा आणि 47 ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता दहावी आणि बारावीतील प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आणि 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांचा समावेश होता.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमधून निवड झालेल्या युवक विद्यार्थ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ कौतुकास्पद असल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, विद्यार्थी जिद्दी असून, ध्येयपूर्तीसाठी मेहनत घेत आहेत. तालुक्यातील विद्यार्थ्यांची विविध शासकीय स्पर्धा परीक्षांमधून होणारी निवड तसेच इयत्ता 10 वी, 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांची झालेली वाढ, तसेच NEET, जेईई, सीईटी, पोलिस भरती आदी परीक्षांमधील यशाचा चढता आलेख पाहता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ कौतुकास्पद आहे, असं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.
पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यामध्ये सन 1952 मध्ये ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आज तीनही संस्थांमध्ये सुमारे 35 हजार विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे, प्रोत्साहन देण्याचे व विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम केले जात आहेत. तसेच तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत आहेत. या स्पर्धा परीक्षांसाठी शिक्षण संस्थांच्या मार्फत सहकार्य केले जात असून, इंदापूर येथे रात्र अभ्यासिका सुरू केली जात आहे, अशी माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.