दीपक खिलारे
इंदापूर : Indapur News – इंदापूर तालुक्यातील करेवाडी ते वायरलेस या रस्त्याला जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ मध्ये मंजुरी मिळाली असून या रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Indapur News)
आता आठ ते दहा किलोमीटर वळसा कमी होणार
करेवाडी ते वायरलेस या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडल्याने परिसरातील आगोती, कळाशी, गंगावळण या गावातील नागरिकांना इंदापूरला येण्यासाठी वरकुटे बुद्रुक वरून आठ ते दहा किलोमीटर जास्त प्रवास करून यावे लागत होते. यामध्ये नागरिकांचा अधिकचा वेळ व गाडीचे इंधन वाया जात होते.
या रस्त्याच्या मंजुरीसाठी मागील दोन वर्षांपसून इंदापूर काँग्रेसचे उपाध्यक्ष निवास शेळके पाठपुरावा करत होते. त्यांनी याबाबत पंचायत समिती विकास अधिकारी तसेच बांधकाम विभाग यांच्याशी वारंवार संपर्क करून रस्त्याची समस्या मांडली होती. शेळके यांच्या वारंवारच्या निवेदन व प्रत्यक्ष भेटीनंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व बांधकाम विभागाचे अभियंता शिवकुमार कुपल यांनी सदर रस्त्याची स्थळ पाहणी करत लवकरात लवकर रस्ता मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते.
एक महिन्यापूर्वीच्या स्थळपाहणीनंतर गटविकास अधिकारी यांच्या अहवालानुसार रस्ता मंजूर झाल्याने परिसरातील नागरिकांनी सदर रस्त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करत असणारे इंदापूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष निवास शेळके यांचे आभार मानले. यावेळी नागरिकांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार करून घेण्याची मागणी निवास शेळके यांच्याकडे केली आहे.