लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात दुचाकीवरून येणाऱ्या दोन मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागील चार दिवसांपासून मॉर्निंग वॉक, रस्त्यावर पायी जाणा-या आणि दुचाकीवर चाललेल्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून नेल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच, आता लोणी काळभोर येथील एका चालकाचा 15 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना माळीमळा परिसरातील दर्जाबिर्याणी जवळ शनिवारी (ता.9) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी सोनु मुस्लीम अन्सारी (वय 28, सध्या रा. भोसले चाळ, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे. मुळ रा.बदुलीया, राज्य झारखंड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनु अन्सारी हे लोणी काळभोर येथे कुटुंबासोबत राहत आहेत. सोनु अन्सारी हे वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सोनु अन्सारी हे त्याच्या वैयक्तिक कामानिमित्त पायी चालले होते. पुणे सोलापूर महामार्गावरून जात असताना, मोटारसायकलवरील दोन अनोळखी इसमांनी सोनु अन्सारी यांच्या हातातील मोबाईल फोन हिसका मारुन जबरदस्तीने चोरुन नेला. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.
दरम्यान, मागील चार दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉकला चाललेल्या एका व्यक्तीचा मोबाईल मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एचपी गेट नंबर दोनच्या समोर पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर तीन दिवसांपूर्वी एकआयटी व लोणी स्टेशन परिसरातदेखील अशाच पद्धतीने मोबाईल चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. मात्र, या तिन्ही घटनेतील नागरिकांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही. मात्र, भुरट्या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.