उरुळी कांचन, (पुणे) : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने मोबाईल शॉपी व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. 05) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन गावच्या हद्दीतील समर्थ मोबाईल शॉपीमध्ये ही घटना घडली आहे.
याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 6 जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, परिसरात कोयता घेऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय हनुमंत कुंजीर (वय -30, रा. वळती, ता. हवेली), असे हल्ला करण्यात आलेल्या मोबाईल शॉपी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रोहीत कुंजीर व भरत कुंजीर (दोघांचेही पूर्ण नाव माहित नाही, रा. दोघेही वळती, ता. हवेली) व इतर चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडल्यापासून सर्वच आरोपी फरार असून उरुळी कांचन पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय कुंजीर यांचे उरूळी कांचन गावच्या हद्दीतील समर्थ मोबाईल शॉपीचे दुकान आहे. अक्षय कुंजीर व आरोपी रोहीत कुंजीर हे एकाच गावात राहतात. मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये काही किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. यावेळी रोहित कुंजीर याने तुला बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्यानंतर फिर्यादी यांनी काही दिवस मोबाईल दुकान बंद ठेवले होते.
गुरुवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अक्षय कुंजीर हे एकटेच दुकानात असताना रोहीत कुंजीर व भरत कुंजीर हे दोघेजण भाऊ व त्यांच्या समवेत चार अनोळखी साथीदार यांनी बेकयदा जमाव जमवुन आले होते. यावेळी त्यातील काही जणांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केला. यावेळी तो वार अक्षय कुंजीर यांनी हुकवल्याने थोडक्यात बचावले.
दरम्यान, यावेळी काउंटरचे तसेच मोबाईल व मोबाईल शॉपीचे नुकसान करून शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अक्षय कुंजीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील सहा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत.