लोणी काळभोर, (पुणे) : जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मंदिरातील दागिन्यांची व दानपेटीची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली आहे. आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना घडल्या होत्या.
विनायक दामू जिते (रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 3 लाख 92 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, पितळी धातूच्या व इलेक्ट्रिक वस्तू व रोख रक्कम असा 3 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिरातील साहित्य चोरी केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर घटनेचा तपास पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस अमोल वडेकर, संजय साळवे व मंगेश अभंग हे करीत असताना सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे एक इसम चोरी करीत असल्याचे आढळून आले.
सदर इसमाबाबत तांत्रिक दृष्टया तपास करून गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, सदरचा इसम हा विनायक दामू जिते हा असून सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच जिते हा शिक्रापूर या ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलीस हवालदार संजय साळवे व मंगेश अभंग यांनी शिक्रापूर येथून ताब्यात घेतले.
मंदिर चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने चोरीची कबुली दिली. तसेच अधिक विचारपुर केली असता त्याने शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, लाखणगाव येथील देवीचे मंदिर, मांदळेवाडी येथील हनुमान मंदिर, जारकरवाडी येथील बोल्हाई मातेचे मंदिर, असे पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याचे सांगितले.
दरम्यान, अधिक चौकशी केली असता शिक्रापूर येथील राउतवाडी येथील कवटेमळा येथील वडजाई माता मंदिर, खेड राजगुरूनगर येथील कन्हेरसर येमाई जुने ठाणे मंदिर, शिरूर सविंदणे येथील काळूबाई मंदिर, रांजणगाव फंडवस्ती येथील तुकाई माता देवी मंदिर, घोडेगाव शिंदेवाडी येथील खंडोबा मंदिर व कळंमजाई मंदीर, तसेच अहमदनगर जिल्हयातील सुपा पेथील तुकाई मंदिर वाडेगव्हाण पारनेर व नगर एम.आय.डी.सी. येथील श्री. खंडोबा मंदिर शिव मल्हारगड, पिंपळगाव माळी इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळी मंदिरात चोऱ्या केल्या असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 63 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 1 लाख 17 हजार रु किंमतीचे चांदीचे मुखवटे व पितळी धातूच्या 80 हजार रुपये किमतीच्या वस्तु, किंमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य व 32 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अमोल वडेकर, अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित सांगडे, रमेश इचके, पोलीस हवालदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राक्षे गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे, सर्व पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे व पोलीस हवालदार विक्रम तपकीर, निलेश सुपेकर, मंगेश थिगळे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, लाखणगाव पोलीस पाटील कल्पना बोऱ्हाडे यांनी केली आहे.