योगेश शेंडगे
शिक्रापूर : रांजणगाव येथून चालत जात असताना, तीन अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकलवरुन येवून, कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल चोरी केल्याची घटना ५ मार्च रोजी घडली होती. तर दुसऱ्या घटनेत एमआयडीसीमधील पेप्सिको कंपनीसमोरुन जात असताना, स्कुटीवरील तीन अनोळखी व्यक्तींनी रस्ता विचारण्याचा बहाणा करुन त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना ९ मार्च रोजी घडली होती. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांचा तपास केला असून, गुन्हेगारांकडून ८२ हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली स्कुटी मोटारसायकल जप्त केली आहे.
पहिल्या घटनेची फिर्याद गजानन सुखलाल राऊत यांनी दिली होती. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी (पुणे ग्रामीण) पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दिलेल्या सूचनांप्रमाणे सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील आरोपी इस्तेखार इंतेजार शेख (वय १९, रा. चितळे रोड, दत्त बेकरी, ता. अहमदनर), राजेश भगवान पाखरे (वय १९, रा. गाईकेमळा, रेल्वे स्टेशन, ता.जि. अहमदनगर), गुरप्रित श्रीपती घोडके (वय १९ वर्षे, रा. नेमाणे ईस्टेट, केडगाव देवी रोडी, जि. अहमदनगर) यांना २५ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. सदर आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी अशाच प्रकारे शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत १, कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत १ व रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २ असे एकूण ४ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून एकूण ८२ हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली स्कुटी मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार आहेत. हे कामगार कंपनीमध्ये जाता-येताना त्यांना अडवून, कोयत्याचा धाक दाखवून, त्यांच्याकडील मोबाईल चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी एमआयडीसी परिसरात दररोज साध्या वेषात तसेच सरकारी वाहनातून गणवेशामध्ये पेट्रोलिंग सुरु केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक (पुणे) रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (शिरूर विभाग) प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस हवालदार विजय शिंदे, पोलीस हवालदार उमेश कुतवळ, पोलीस हवालदार विलास आंबेकर, पोलीस हवालदार वैज्जनाथ नागरगोजे यांनी केला. अधिक तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे व पोलीस हवालदार तेजस रासकर करत आहेत.