पुणे : नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून 2024 सुरु झाले आहे. याकरिता शाळा भेटीसाठी गेलेल्या शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर जिल्हा परिषद शाळेत शुक्रवार (दि.28) रोजी हा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास दोन शिक्षकांनी ‘तु आलास आता बस, तुला चहापाणी करतो. तुझा मोठा सत्कार करतो’ असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याला मुख्याध्यापक कक्षात कोंडले. तसेच त्या अधिकाऱ्याच्या पायावर पाय ठेवून बळजबरीने त्यास खुर्चीत बसवले आणि अखेरीस त्यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना ‘तुला आता इथेच मारुन टाकतो’ अशी धमकी देत बेदम मारहाण करुन हाकलून देण्यात आले आहे.
या प्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ बजाबा पवार यांनी दिलेल्या लेखी अहवालावरुन तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेल्या संभाषण व चित्रफितीच्या आधारे महेश आनंदराव काळे व कैलास फक्कड पाचर्णे या दोन शिक्षकांवर गटविकास अधिकारी महेश डोके यांनी घटनेची दखल घेत मंगळवारी तडकाफडकी या दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ बजाबा यांनी पंचायत समितीला सादर केलेल्या अहवालानुसार, ते शुक्रवारी रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट व तपासणीसाठी गेले होते. त्यांनी शाळेत प्रवेश करताच महेश काळे व केलास पाचर्णे या शिक्षकांनी त्यांना दमदाटी तसेच शिवीगाळ केली आहे.
दरम्यान, शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ पवार हे पहिल्यांदाच दत्तनगर येथे शाळा भेटीसाठी गेले होते. नवीन वर्षाची सुरवात झाली असताना आणि सुरु झालेल्या शाळांना भेटी देऊन पाहणी करण्याच्या सूचना शिक्षणाधिका-यांनी केल्या असल्यामुळे प्रत्येक शाळांना भेटी देऊन पाहणी करण्याची मोहिम पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत सुरु केली आहे. त्याअंतर्गत पवार हे शाळा तपासणीसाठी गेल्यानंतर हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले.