पुणे : राज्यभरात आज रविवारी (ता.16) कंत्राटी ग्रामसेवक परीक्षा सुरळीत सुरू असताना, पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर 6 परीक्षार्थीना परीक्षा देण्यापासून रोखल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परीक्षा केंद्रावर काहीवेळ गोंधळ उडाला होता.
स्मिता वसंत धेंडे, कविता विष्णू कांबळे, सुरज शिवाजी सोनवणे, रोहिणी गोपिनाथ कुचेकर, पूजा प्रभु लिंग कोरे, अर्चना गोरख जाधव असे परीक्षेपासून रोखण्यात आलेल्या परीक्षार्थ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवने येथील शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या ठिकाणी कंत्राटी ग्रामसेवक परीक्षेचे केंद्र होते. या केंद्रावर सर्वात प्रथम वरील सर्व परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला होता. या मधील काही विद्यार्थिनींकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे विद्यार्थिनींना ओळखपत्राची मुळ पत्र घेऊन येण्यासाठी सांगितले. त्यानंतर परीक्षार्थी मुळ कागदपत्रे घेऊन आल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, प्रवेश देण्याची वेळ संपलेली आहे. असा आरोप वरील परीक्षार्थींनी केला आहे. तसेच आमच्या नुकसानीस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे.
दरम्यान, परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाल्याने, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परीक्षेला पोलिसांनी थोडा वेळ शिल्लक आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश द्या. अशी विनंती केली. पात्र केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांना प्रवेश नाकारला.
याबाबत बोलताना परीक्षा केंद्र प्रमुख विशाल शेटकर म्हणाले की, शासनाने दिलेल्या आदेशानुसार जे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर मुळ ओळखपत्रासह वेळेवर आले होते. त्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला. जे विद्यार्थी मूळ कागदपत्र घेऊन परीक्षा केंद्रावर वेळेवर आले नव्हते. त्यांना परीक्षेपासून रोखण्यात आलेले आहेत.