पिंपरी- चिंचवड : लवकरात लवकर बांधकाम उरकून सदनिकाधारकांना ताबा देण्याच्या हव्यासापोटी अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा प्रत्यय नुकताच पिंपरी-चिंचवड येथे आला. बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानकपणे झुकल्याने एकच खळबळ उडाली. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. अर्धवट झुकलेल्या स्थितीत असलेली ही इमारत कधीही खाली कोसळू शकते, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताचपोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीचे बांधकाम वाय पद्धतीचे आहे. दोन पिलरवर इमारत उभारण्यात आली आहे. त्यामुळे ती झुकल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये वाकडमधील पोलीस ठाण्यासमोरच्या गल्लीत हे बांधकाम सुरू आहे. मध्यरात्री अचानक बांधकाम सुरू असलेली इमारत अचानक एका बाजूला झुकली. या घटनेमुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे नागरिक घाबरले होते. अग्निशमन दल, पोलीस आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले.
तीन मजली असलेली ही इमारत वाय पद्धतीने उभारण्यात आली आहे. दोन पिलरवर उभारलेली इमारत असल्यानेच ती झुकल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही इमारत पाडण्याची शक्यता आहे. सध्या तरी पोकलेनच्या साहाय्याने इमारतीला सपोर्ट देण्यात आला आहे.