पुणे : रागाच्या भरात पोलीस उपनिरीक्षकावर झाडाची कुंडी फेकून मारण्याचा धक्कादायक प्रकार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता. १) दुपारी एकच्या सुमारास घडला. आरोपीने शिवीगाळ करुन स्वत:चे डोके पत्र्यावर मारुन आत्महत्या करण्याची धमकी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मिटींग चालू असताना एकाने पोलीस उपनिरीक्षकावर झाडाची कुंडी फेकून मारली. तसेच शिवीगाळ करुन आत्महत्या करण्याची धमकी दिली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक लहु रोहीदास सातपुते यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन राहुल त्रिवेणी मिश्रा (वय-३३, रा. मिलींग बेकरीच्या पाठीमागे, विश्रांतवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात विश्रांतवाडीमधील विविध रहिवासी व बिल्डरचे कामगार यांच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मिटिंग सुरु होती. अजमेरा बोरा बिल्डरचे कामगार, मॅनेजर व रहिवासी यांच्यात चर्चा सुरू असतानाच आरोपी राहुल मिश्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे रागात आला. त्यावेळी त्याला जागेवर बसण्यास सांगितले. मात्र, तो जागेवर न बसता अजमेरा बिल्डरचा कामगार अशोक कदम याच्या अंगावर धावून गेला.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते यांनी राहुल याला समजावून सांगितले. त्यावेळी आरोपीने सातपुते यांच्यासोबत अरेरावी करुन त्यांच्या अंगावर धावून गेला. आरोपी मिश्रा याने फिर्य़ादी लहु सातपुते यांना एकेरी भाषेत मोठमोठ्याने शिवीगाळ केली. तसेच त्याठीकाणी असलेली फायबरची मातीने भरलेली झाडाची कुंडी उचलून सातपुते यांना फेकून मारली. त्यानंतर स्वत:चे डोके पत्र्यावर मारुन घेत आत्महत्या करण्याची धमकी दिली.
आरोपीने फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.