अरुण भोई
राजेगाव : वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणच्या केडगाव विभागाने दौंड तालुक्यातील २४ गावांत ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यास ७ डिसेंबरपासून सुरुवात केली. आतापर्यंत ४ गावांत हा उपक्रम राबवून वीज समस्यांचे जागीच निराकरण करण्यात आले आहे. तर २८ डिसेंबरपर्यंत उर्वरित गावांतही नियोजित तारखेला हा उपक्रम राबविला जात आहे.
‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम केडगाव परिमंडलाचे मुख्य कार्यकारी अभियंता दरवडे, उपकार्यकारी अभियंता चव्हाण, कनिष्ठ अभियंता धोत्रे यांच्या संकल्पनेतून साकारला असून, प्रभारी अधीक्षक अभियंता दरवडे व कार्यकारी अभियंता चव्हाण, यांच्या माध्यमातून दौंड तालुक्यात याची युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू आहे.
या उपक्रमाअंतर्गत नवीन वीज जोडणी तत्काळ देणे, वीज बिल तक्रारींचे तत्काळ निराकरण करणे, नादुरुस्त वीज मीटर तत्काळ बदलणे, उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांची दुरुस्ती करणे, आवश्यक त्याठिकाणी नवीन पोल उभारणे, लूज गाळ्यांना ताण देणे, वीज रोहित्रांची व रोहित्र पेट्यांची दुरुस्ती करणे, केबल बदलणे यांसह ग्राहकांच्या विविध तक्रारींचे निराकरण आदी कामे केली जात आहेत.
दरम्यान, राजेगाव येथे सरपंच प्रवीण लोंढे यांनी महावितरणचे अभियंता चव्हाण व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची भेट घेऊन गावातील अनेक समस्यांबाबत चर्चा केली. या वेळी राजेगावमधील नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य सोपान चोपडे, मिलिंद मोरे, सचिन खैरे, सतिश खैरे, सचिन जाधव, महावितरणचे वायरमन गजानन पवळ, दाऊत सय्यद, राहुल गायकवाड, सोमनाथ चितारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.