केडगाव : रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस बाहेरगावावरून शहरात येणार्या छोट्या विक्रेत्यांवर मुजोरी करत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी तसेच परप्रांतीय छोटे विक्रेते शहरात आपला माल विक्री करण्याकरिता रस्त्याच्या कडेला आपली दुकाने लावून माल विक्री करतात. काही शेतकरी, विक्रेते रेल्वे हद्दीतील रस्त्यांवरही दुकाने लावतात अशा विक्रेत्यांना रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस दुकाने लावू नयेत म्हणून मज्जाव करत आहेत.
शेतीमाल विक्रेत्यांनी लावलेली दुकाने त्यांना काढायला लावली जात आहेत. रेल्वे हद्दीत अशा प्रकारची दुकाने लावताना रेल्वे प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यकच आहे. मात्र, याची विक्रेत्यांना माहिती नसल्याने त्यांच्याकडून हे होत नाही, म्हणून त्यांना आपला माल विकू देऊ नये हे अन्यायकारक आहे. यातून काहीतरी मार्ग काढून या विक्रेत्यांना पोलिस प्रशासनाने व दौंडकरांनी मदतीचा हात दिला पाहिजे, अशी मागणी शेतकरी, विक्रेत्यांकडून होत आहे.
अवैध धंदे वाढलेत
रेल्वे हद्दीमध्ये दौंडला मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे बोकाळले आहेत. येथील नव्याने झालेल्या कॉर्डलाईन रेल्वे स्थानक परिसरात गुन्हेगारी फोफावली आहे. रेल्वे कर्मचार्यांना, लोको पायलट, रेल्वे प्रवासी यांना मारहाण करून लुटले गेल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
लोको पायलटला झाला होता लुटण्याचा प्रयत्न
डिझेल चोरी प्रकरण देखील घडले आहे. चोरट्यांनी एका महिला लोको पायलटवर हल्ला करून तिला लुटण्याचा प्रयत्न केला, तिने आरडाओरडा केल्याने तेथील रिक्षा स्टॅन्डवरील रिक्षावाल्यांनी तिला वाचविले, अशी गंभीर घटनाही या ठिकाणी घडली आहे. मात्र, या प्रकरणाची कुठंच तक्रार झाली नसल्याने हे गंभीर प्रकरण दाबले गेले. अशी परिस्थिती रेल्वे हद्दीत असताना त्याकडे गांभीर्याने न पाहता येथील पोलीस प्रशासन मात्र छोट्या विक्रेत्यांवर, शेतकर्यांवर कारवाई करण्यात धन्यता मानत आहे.