पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार अशी लढत होणार असे बोलले जात असताना विजय शिवतारे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला आहे. काहीही झालं तरी आपण बारामती लोकसभा निवडणूक लढणारच, असा निश्चय केलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी ही भेट होणार असून, विजय शिवतारे आपली उमेदवारी माघारी घेणार का आपल्या मतावर ठाम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजय शिवतारे यांच्या उमेदवारीमुळे सुनेत्रा पवारांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत ‘शिवतारे आमदार कसा होतो ते बघतोच’ असं म्हणत अजित पवारांनी त्यांचा पराभव केला होता. तो पराभव शिवतारे यांच्या जिव्हारी लागला असून, त्याचे उट्टे या लोकसभा निवडणुकीत काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
राष्ट्रवादीचा अजित पवार गट विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे नाराज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी याबद्दल तक्रार केली आहे. बारामतीमध्ये उमेदवार डॅमेज केला तर राष्ट्रवादी कल्याणमध्ये त्याचा बदला घेईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना भेटीसाठी बोलावलं आहे. दरम्यान, काहीही झाले तरी आता आपण माघार घेणार नसल्याचे विजय शिवतारे यांनी याआधी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढणार का हे पाहावे लागेल.
दरम्यान, माजी मंत्री विजय शिवतारे बुधवारी (ता. १३) बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होते. विजय शिवतारे यांनी कण्हेरी येथील मारुतीरायाचे दर्शन घेतले. कण्हेरी गावातून इंदापूरकडे जात असताना अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी गावात कार्यकर्त्यांनी विजय शिवतारे यांचे जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, अशी मागणी केली आहे. अजित पवारांवर सातत्याने टीका केल्याने महायुतीत वाद निर्माण होईल, असा इशाराही तटकरे यांनी दिला आहे.