-राहुलकुमार अवचट
यवत : आमदार राहुल कुल यांना 20 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी केल्यास त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरवंड येथे सभेत दिले. भाजपाचे विद्यमान आमदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ सांगता सभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज वरवंड येथे संपन्न झाली.
दौंड विधानसभा मतदार संघातील प्रचार शिगेला पोहोचला असून रविवारी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सांगता सभा पार पडली. आज त्याच ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 तारखेला नवीन रेकॉर्ड करणारी ही सभा असून 20 तारखेला राहुल कुल व कांचन कुल यांच्या लग्नाचा वाढदिवस असून कचाकच कमळ चिन्ह समोरील बटन दाबून दोघांना लग्नाचे गिफ्ट द्यावे असे आवाहन केले. आजची गर्दी पाहता राहुल कुल मागील सर्व रेकॉर्ड तोडणार यात शंका नाही, राहुल कुल यांना मंत्री करायचे ठरवलेले असून 20 हजार पेक्षा कमी मताने निवडून आल्यास राज्यमंत्री व वीस हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आल्यास कॅबिनेट मंत्री करणार, असे आश्वासन देताच कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली.
राहुल कुल हे 7 दिवस 24 तास सातत्याने फक्त जनतेचा विचार करणारा आमदार आहे. राहुल कुल यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना सलाम करावा असे वाटते. पूर्वी बारामती म्हटलं की सगळं सुजलाम सुफलामच आहे असे वाटले. नंतर मुख्यमंत्री झाल्यावर लक्षात आला की इकडे दुष्काळी भाग आहे, पाणी पोहचलेलं नाहीये. जलसंधारणाच एक नवीन पॅटर्न कुल यांनी तयार केला असून त्याला आता राहुल कूल पॅटर्न असे म्हणतात. खरं म्हणजे जे न होणार काम शेवटच्या टप्प्यापर्यंत आणले असून यामुळे या क्षेत्राचा चेहरा बदलेल असं मुळशीच पाणी या भागात आणण्याचा विशेष प्रयत्न करत सकारात्मक अहवाल प्राप्त झाला आहे. आता पुन्हा तुम्ही तिसऱ्यांदा आम्हाला सरकारमध्ये बसवलं की मग या अहवालाला गती देतो, असे आश्वासन दिले.
दौंड एमआयडीसीची मागणी होत असून दौंडला येणारे रस्ते उत्तम झाल्याने एमआयडीसी साठी कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील. भीमा पाटस कारखाना अडचणीत असताना राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे काम पुन्हा सुरू झाले. यापुढील काळात भीमा पाटस हा या भागातील सर्वात चांगला कारखाना असेल, शरद पवार यांनी इन्कम टॅक्स साठी अनेक वेळा प्रयत्न करूनही जे शक्य झाले नाही ते अमित शहा यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी एकच मागणी पूर्ण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कारखानदारी उभी आहे. शेतकऱ्यांना आज हजार कोटी रुपये दिले, वीज बिल शून्य केले. पुढील पाच वर्षे कृषी पंपाची वीजबिल माफ आहे, माहितीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना 12 तास अखंडित वीज मिळेल, शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार असून सात बारा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे सरकारने महिलांसाठी बेटी बचाव, लखपती दीदी, लाडकी बहीण योजना, महिलांसाठी एसटी सवलत यासारख्या अनेक योजना आणल्या असून यामुळे महिलांना सन्मान मिळाला आहे.
दौंड तालुक्यात शैक्षणिक संकुल करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले. लाडकी बहीण योजना सुरू केली असून महाविकास आघाडीच्या सावत्र भावांनी ही योजना बंद पाडण्यासाठी न्यायालयात दात मागितली. परंतु लाडक्या भावांनी ही योजना चालू ठेवत नोव्हेंबर पर्यंत बहिणींच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. महायुती सरकार आल्यानंतर तरुणांना पंधरा लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणार असल्याचे सांगितले. महायुतीचे सरकार येण्यासाठी दौंड विधानसभेचे उमेदवार राहुल कुल यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.
यावेळी राहुल कुल यांनी दौंड विधानसभा मतदारसंघासाठी देवेंद्र फडणवीस यांनी भक्कमपणे उभे असून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने आभार व्यक्त केला. वरवंड येथील गर्दीचे सर्व विक्रम आजच्या सभेने मोडले असून विरोधकांना याच ठिकाणी कोपरा सभा घेतली अशी टीका केली. शेतकऱ्यांना वीज माफी द्यावी व दौंड तालुक्यातील युवकांच्या नोकरीसाठी एमआयडीसी व्हावी अशी मागणी केली. यावेळी भाजपा व महायुती सरकारने केलेल्या कामाची योजना जनतेला देत, दहा हजार पेक्षा जास्त शस्त्रक्रिया मार्गी लावल्या असून पाच हजार कोरोना रुग्णांना मदत केली असल्याचे सांगितले.
केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या सर्वच योजना मतदार संघातील नागरिकांपर्यंत पोहोचवले असून महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी देऊ नये अशी टीका विरोधकांनी केली. याला आमदार राहुल कुल यांनी यावेळी उत्तर दिले. विरोधकांबरोबर विकासाची चर्चा करायची तयारी असून विरोधक मात्र चर्चेसाठी येत नाहीत, गेल्या दहा वर्षात काम करताना जात-पात न पाहता सर्वांना मदत केली. परंतु विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने फक्त बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारकरी संप्रदायाच्या मागणीनुसार दौंड येथील कत्तल खाण्याचे काम बंद झाले असून ते कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, अशी ग्वाही राहुल कुल यांनी दिली.
यावेळी योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या वैशाली नागवडे, नंदू पवार, महेश भागवत, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला मतदान करावे असे आवाहन केले.