पुणे : आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिममध्ये बदली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. पूजा खेडकरविरुद्ध प्रशासनाकडे अनेक तक्रारीही आल्या होत्या. सध्या खेडकर या त्यांच्या रुबाबामुळे चर्चेत आहेत. परंतु त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आता पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवण्यात आला आहे.
लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LSBNAA), अहवाल तपासून अंतिम रिपोर्ट युपीएससी यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. आयएएस होण्यासाठी अंशत: अंध असल्याचे प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी दिले होते. त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट ओबीसी जात प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
LSBNAA चे उपसंचालक शैलेश नवल यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मान्यतेनंतर राज्याच्या सामान्य प्रशासनाला अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर त्यांच्या परवानगीशिवाय सौनिकच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. सौनिक यांनी एका हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार “ती वेळ न मागता आत आली, त्यानंतर मी तिला जाण्यास सांगितले आणि सामान्य प्रशासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना भेटायला सांगितले कारण माझे कामाचे वेळापत्रक व्यग्र आहे.” दरम्यान, पूजाची बदली झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पूजा आज वाशिममध्ये कर्तव्यावर रुजू झाली आहे.
पूजा खेडकर यांच्यसंदर्भात समोर आलेल्या गोष्टी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचं गैरवर्तन या पार्श्वभूमीवर त्यांची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं असून बुधवारी थेट पंतप्रधान कार्यालयानं पूजा खेडकर यांच्यासंदर्भातला अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यावर दिल्लीतूनही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.