पुणे : कौटुंबिक वादातून पोलिसांकडे दिलेली तक्रार पत्नी मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीहरी बभ्रुवान नरवटे (वय ३५, रा. खरोसा, जि .लातूर) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत पत्नी अनिता श्रीहरी नरवटे (वय ३१, रा. भेकराईनगर, हडपसर) हिने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहा वर्षांपूर्वी अनिता आणि श्रीहरी यांचा विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर काही दिवसांत दोघांमध्ये वाद झाले. कौटुंबिक वाद असह्य झाल्याने अनिताने पतीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या दरम्यान अनिता पतीपासून वेगळी राहत होती. हडपसर भागातील एका रुग्णालयात ती काम करत होती.
या वेळी आरोपीने रुग्णालयात येऊन गोंधळ घातला. आमच्याविरुद्ध पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे का घेतली नाही, अशी विचारणा करुन त्याने पत्नी अनिताच्या अंगावर ॲसिड फेकले. या घटनेत अनिता जखमी झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.