पुणे : व्याजाने पैसे काढून सुरु केलेल्या हॉटेलमध्ये 50 टक्के भागिदारी देण्याचा तगादा लावला. तसेच व्याज घेऊन परस्पर हॉटेलमधील सामानाची विक्री करुन राहत्या घराची विक्री करण्याच्या धमकीमुळे एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते सोमवार (दि.13) या कालावधीत व्यावसायिकाच्या राहत्या घरी घडला. शिवराज विजयकुमार वडलाकोंडा (रा. महात्मा पुळे पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे.
याप्रकरणी रोहित सुभाष भोंडे (रा. एच.पी. लोहियानगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत स्नेहल शिवराज वडलाकोंडा यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती शिवराज यांनी आरोपी रोहित भोंडे याच्याकडून सप्टेंबर 2022 मध्ये पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या पैशातून त्यांनी खराडी येथे ‘द इंडीगो’ नावाचे हॉटेल सुरु केले होते. फिर्य़ादी यांच्या पतीने आरोपीकडून घेतलेल्या पैशांचे व्याज वेळोवेळी दिले.
मात्र, रोहित भोंडे याने शिवराज यांच्याकडे हॉटेलमध्ये भागीदार करून दरमहिना 50 टक्के रक्कम देण्यासाठी तगादा लावला होता. फिर्यादी यांच्या पतीने 50 टक्के देण्याबाबत विचार करण्यासाठी मुदत मागितली होती. त्या मुदतीत आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला काहीही कल्पना न देता परस्पर हॉटेलच्या साहित्याची विक्री केली.
तसेच शिवराज यांच्याकडे 5 लाख रुपयांची सतत मागणी करुन त्रास दिला. रोहित याने शिवराज याच्या आईच्या नावावर असलेल्या घराची कागदपत्र तयार करुन त्याची विक्री करण्याची धमकी दिली. सततच्या त्रासाला वैतागून फिर्यादी यांच्या पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी रोहित भोंडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तापास पोलीस करीत आहेत.