अक्षय भोरडे
तळेगाव ढमढेरे : पुणे जिल्ह्यात चोरीच्या घटना सातत्याने समोर येत असतात. मात्र, असे असले तरी प्रामाणिकपणासुद्धा जीवंत असल्याचा प्रत्यय नुकताच आला आहे. सर्वसामान्य जनता आर्थिक संकटातून जात असतानाही नैतिकदृष्ट्या खंबीर असेल तर ते खरोखरच कौतुकास्पद आहे. शिक्रापुरात एसटीच्या चालक व वाहकाने प्रामाणिकपणा दाखवून पाच लाखांची सोनसाखळी मूळ मालकाला परत केली. त्यांच्या या गुणांचे परिसरात कौतुक होत आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिरुर एसटी स्थानकातून आलेल्या (एम. एच. १४ बी. टी. १२२९) या एस.टी. बसमधून सुशन वाघमारे हे त्यांच्या कुटुंबियांसह प्रवास करत शिक्रापूरमध्ये आले. प्रवासात त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये वाघमारे यांनी पाच लाख रुपये किमतीची सोनसाखळी ठेवली होती. शिक्रापूरमध्ये आळंदीहून आलेले प्रवासी असल्याने खूप गर्दी होती. वाघमारे यांचे लहान बाळ रडत असल्यामुळे वाघमारे घाईत खाली उतरले. मात्र, त्यांची किमती सोनसाखळी असलेली बॅग एसटीमध्येच राहिली.
दरम्यान, ही घटना सुशन वाघमारे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या सचिन कुदळे या मित्राच्या मदतीने त्यांनी शिरुर बस स्थानकात संपर्क साधत, घडलेला प्रकार सांगितला. बस स्थानकातील लिपिक सागर खामकर यांनी तातडीने एसटीचे वाहक संदीप थोरवे यांच्याशी संपर्क साधून एसटीमध्ये बॅग आहे का, याची खात्री करण्यास सांगितले. बॅग एसटीमध्येच असल्याचे निदर्शनास आले.
वाहतूक नियंत्रक सतीश सोनवणे यांच्या उपस्थितीत सुशन वाघमारे यांच्यासमोर बॅगची तपासणी केली असता, बॅगमध्ये पाच लाख रुपये किमतीची सोनसाखळी आढळली. ही सोनसाखळी वाघमारे यांना सुपूर्त करण्यात आली. या वेळी वाघमारे यांनी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. प्रामाणिकपणाबद्दल एसटीचे चालक हनुमंत गुंडकर व वाहक संदीप थोरवे यांचे शिरूर तालुक्यातून कौतुक होत आहे.