दौंड : दौंड तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. स्विफ्ट कार गरम झाल्याने रस्त्यावर उभा करून ती दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी अचानक आलेल्या हायवा डंपरने कारसह चौघांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज (दि. २३)सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दौंड तालुक्यातील वाखारी येथे घडली आहे.
रोहित प्रकाश पोकळे असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील गंज पेठ येथील अमित धनजय बोराटे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रदिप बाळासाहेब माने (वय-३८ वर्षे रा. वरखंड, ता. दौड, जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित बोराटे यांच्यासह मित्र सुरज मधुकर पेटाडे, रोहित प्रकाश पोकळे आणि विजय श्रीनिवास क्षीरसागर हे चौघेजण स्विफ्ट कारमधून पुण्याहून देवदर्शनासाठी सोलापूर कडे निघाले होते. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास स्विफ्ट कार पुणे सोलापूर महामार्गावरील वाखारी येथे अचानक गरम झाली.
त्यामुळे त्यांनी महामार्गाच्या कडेला गाडी थाबवून गाडीला काय झाले हे पाहत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या हायवा डंपरने कार आणि क्षीरसागर, पेटाडे, पोकळे या तिघांना जोरदार धडक देत फरफटत नेले. मात्र, अमित बोराटे यांनी बाजूला उडी मारल्याने ते थेडक्यात बचावले.
या अपघातात रोहित पोकळे हे गभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.