पुणे: पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, चोर चक्क गुगलचा वापर करून चोरी करत होते. चौकशी दरम्यान, घटनेबद्दल माहिती देतांना चोरांनी विचित्र चोरीबद्दल खुलासा केला आहे. टोळीतील एक आरोपी उच्चशिक्षित आहे. चोरी करण्याची पद्धत ऐकून पोलीसही चक्रावले होते. ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील रहिवासी असलेल्या सलीम सिकंदर शेख (५८) आणि अजित अर्जुन पिल्ले (४२) या दोन आरोपींना या गुन्ह्यात सहभागी असल्याबद्दल पोलिसांनी अटक केली आहे.
चोर ‘गुगल’ वरून व्यावसायिक कार्यालयाचे पत्ते सर्च करून मग डल्ला मारत असत, चोरी करतांना फोन बंद ठवला जात होता. ज्या ठिकाणी चोरी करणार त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करून पोहोचत असत. दरम्यान, चोरांनी काळेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोकणे चौकातील एका व्यावसायिक कार्यालयात ८ एप्रिल रोजी दरोडा टाकून ३६,००० रुपये चोरले होते. याच प्रकरणाचा तपास करतांना पोलिसांनी तब्बल ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. फक्त १२ दिवसांत संशयितांची ओळख पाठवून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून २,९८,००० रुपयांचा चोरीचा माल जप्त केला असून आरोपींवर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.