पुणे: पुणे शहरातील येरवडा येथील जुन्या तारकेश्वर पुलाचा काही भाग अचानक खचल्याने कोरेगाव पार्कच्या दिशेने जाणारी डावी बाजू बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येरवड्याहून पुणे शहराकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
जुन्या तारकेश्वर पुलाच्या दोन्हीही बाजूने एकेरी वाहतूक आहे. आज शुक्रवार (दि. ९) अचानक या पुलाच्या डाव्या बाजुच्या मार्गिकेवर मध्येच एक खड्डा पडला. या खड्ड्यातून बांधकामासाठी वापरण्यात आलेय लोखंडी सळ्या वर आल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बॅरिकेट लावून सदर मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळेच एक मार्गिका होताच या ठिकाणी वाहनांची मोठी रांग लागली आहे.
सदर पुलावरुन पुणे-नगर रस्ता, लोहगाव, येरवडा, टिंगरे नगर या भागातून पुणे शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. जरी दुहेरी पूल असला, तरी दोन्ही बाजुंनी एकेरी वाहतूक चालते. हा पूल शहरातील सर्वाधिक व्यस्त असलेला पूल आहे. दरम्यान, पुणे स्टेशन आणि स्वारगेट परिसरात जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे आहेत पर्यायी मार्ग
1. विमानतळ रस्त्यावरुन पुणे शहराकडे जाणाऱ्या वाहनांनी – फाईव्ह झिरो नाईन मार्गे कल्याणी नगर – पुढे इच्छित स्थळी जावे.
2. विश्रांतवाडीवरुन पुण्यात जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांनी- डेक्कन कॉलेज मार्गे संगमवाडीवरुन पुढे जावे