उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. यावर वाहतूक विभागाकडून उपाययोजना करण्यात याव्या यासाठी वर्तमानपत्रांमध्ये वारंवार बातम्या देत लक्ष वेधण्यात येत आहे. पण या सगळ्यातून उरुळी कांचनचा वाहतुकीचा प्रश्न कधी सुटेल, याची आशा धरून राहिलेल्या नागरिकांना याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.
पुणे-सोलापूर महामार्गावरील एलाईट चौक व तळवाडी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतून नागरिकांसह या ठिकाणावरून जाणारे मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांनाही या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. बेशिस्त वाहनचालक, अवैध प्रवासी वाहतूक व वाहतूक पोलिसांची कमतरता यामुळे अपघात व कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. आश्रम रोड ते तळवाडी चौक या मुख्य रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग दिवसेंदिवस वाढत असल्याने या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही काहीजण रस्त्यावर गाड्या लावत आहेत.
तीन तालुक्याच्या मधोमध असणारे उरुळी कांचन हे गाव असून, येथे शासकीय व खासगी शाळेत, महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे उरुळी कांचन व परिसरातील सुमारे २० ते २५ गावांमधून येणाऱ्या या विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी प्रवासी वाहनातून केली जाते. उरुळी कांचनचा वर्दळीचा रस्ता चक्क वाहनतळ झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.
तसेच हीच सर्व वाहने तळवाडी किंवा एलाईट चौकाच्या ठिकाणी उभी केली जातात. यवत (ता. दौंड) किंवा हडपसरला जाण्यासाठीच्या या दोन्ही चौकांत ही प्रवासी वाहतूक करणारी वाहने महामार्गावरच थांबवली जात असल्याने या ठिकाणी मोठी कोंडी होत आहे.
उरूळी कांचनमधील मुख्य अंतर्गत रस्त्यावर वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे या रस्त्याची रुंदी कमी झालेले आहे. त्यातच या मार्गावर अस्ताव्यस्त पद्धतीने उभे करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. उरुळी कांचनमधील बहुतेक शाळा, सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळे, बँका, निसर्ग उपचार, आश्रम, पतपेढ्या, यांच्याकडे पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेक वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. या गोष्टीकडे ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे. मात्र, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पोलिसांकडे बोट दाखवत आहेत.
यापुढे दंड आकारण्यात येणार
याबाबत लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे म्हणाले, “उरुळी कांचन तळवाडी चौकातील सिग्नल हे पुढील दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहेत. बसथांबा हा दोन्ही बाजूचा पुढे १०० मीटर अंतरावर घेण्यात येणार आहे. पोलीस गाडीतून बेशिस्त वाहनचालकांना सूचना देण्यात येत आहेत. यापुढे दंड आकारण्यात येणार आहे”.
…तर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही
सामाजिक कार्यकर्ते रतिकांत यादव म्हणाले, “एक सिग्नल खांब व दुसऱ्या बाजूचा लाईटचा खांब काढून घेतल्यास अथवा आतल्या बाजूला सरकवून घेतल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. या दोन्ही बाजूंमुळे चारचाकी गाड्यांना वळण घेताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे हे प्रथम हटवणे गरजेचे असून, संबंधित विभागाला ग्रामपंचायत प्रशासनाने निवेदनाद्वारे कळवावे.”