थेऊर, ता. 15: श्रीक्षेत्र थेऊर (Theur) ग्रामपंचायत हदीतील रुकेवस्ती भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर अडकले होते. सोमवारी पहाटे 2 वाजता PMRDA च्या PDRF पथकासह अग्निशमन विभागाने तातडीने मदतकार्य सुरू करून तब्बल 50 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. रात्री 2 ते पहाटे 4 वाजेपर्यंत झालेल्या या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या पूरस्थितीत 10 म्हशी व 25 शेळ्या वाहून गेल्या तर गोठ्यातील 10 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पहाटे 5 वाजता हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. बचावकार्यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, भरत कुंजीर थेऊरचे मंडल अधिकारी किशोर जाधव, लोणी काळभोर चे मंडल अधिकारी लक्ष्मण बांडे तलाठी अर्जुन स्वामी, कदमवाकवस्तीचे तलाठी अरुण वेडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. पहाटे 4 वाजता थेऊर-नायगाव रस्ता फोडून पाण्याला मार्ग दिल्याने सकाळी 7 वाजता पाण्याची पातळी उतरली.
दरम्यान, रुकेवस्तीतील तब्बल 100 कुटुंबांच्या घरात 3 ते 4 फूट पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून अन्नधान्यही संपल्याने 300 नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. नैसर्गिक ओढ्यातील अतिक्रमणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी त्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.







