अक्षय टेमगिरे

शिरूर: शिरूर (Shirur) तालुक्यात गेल्या सोळा तासांपासून मुसळधार पावसाचा कहर कायम असून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील मेहनतीचे स्वप्न अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचबरोबर बाजरी, मका, पालेभाज्या, फळबागा, नवीन ऊस लागवड या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

कांद्याची खर्चिक लागवड उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी वर्गात हतबलता पसरली आहे. अनेक शेतात पाणी तुडुंब भरल्याने उभे पीक आडवे झाले आहे. नाले व ओढ्यांना पूर आल्याने पाणी बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उभी केलेली पिके एका रात्रीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
या अनपेक्षित आपत्तीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी केली आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास नुकसानाची तीव्रता आणखी वाढण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. तालुक्यातील शेती पाण्याखाली गेल्याचे विदारक चित्र पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात असहाय्यतेची भावना दाटून आली आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी तालुकाभरातून होत आहे.







