पुणे: पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये (Pune Market Yard) भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पितृपक्ष (Pitru Paksha) सुरू असल्यामुळे मेथी आणि कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या आणि नैवेद्यासाठी लागणाऱ्या गवार, भेंडी, तांबडा भोपळा यांची मागणी वाढली आहे. यामुळे पालेभाज्यांच्या दरात (Vegetable Prices) वाढ झाली आहे, तर काही फळभाज्यांचे भाव मात्र घसरले आहेत.

पालेभाज्या महागल्या!

सध्या बाजारात सर्वाधिक मागणी मेथी, कोथिंबीरला आहे. रविवारी कोथिंबिरीची 1 लाख 25 हजार जुडी तर मेथीची 70 हजार जुड्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक 25 हजार जुड्यांनी वाढली असली, तरी मागणीमुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात एका जुडीचा भाव 3 ते 20 रुपये, तर किरकोळ बाजारात तो 15 ते 25 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
या फळभाज्या स्वस्त झाल्या
बाजारात आवक वाढल्यामुळे काही फळभाज्यांचे दर कमी झाले आहेत. यामध्ये टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, गाजर आणि घेवडा यांच्या भावात 5 ते 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. पितृपक्षामुळे गवार, भेंडी, तांबडा भोपळा आणि कारली यांना चांगली मागणी असली तरी, त्यांची आवक-जावक संतुलित असल्याने त्यांचे भाव स्थिर आहेत.







