नागपूर: नागपूरच्या धंतोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जण २४ जूनपासून बेपत्ता झाले असून, त्यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, धंतोली पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.

धंतोली परिसरात ७१ वर्षीय श्यामसुंदर परसवानी राहतात. त्याच घरात त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील सदस्यही राहत होते. २४ जून रोजी सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील पाचही सदस्य घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते परतले नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र, अनेक ठिकाणी चौकशी करूनही त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

बेपत्ता झालेल्यांमध्ये हर्षा परसवानी (वय ५७), जितेंद्र परसवानी (वय ४२), इशिता परसवानी (वय ४०), खुशी परसवानी (वय २१) आणि कृष्णा परसवानी (वय १२) यांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील एका सदस्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे कुटुंबाने घर सोडले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
कुटुंबाचा काहीच शोध न लागल्याने श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलच्या मदतीने मोबाईल फोनचे लोकेशन तपासण्यात आले. या तपासात बेपत्ता कुटुंबातील सदस्यांचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळून आले.
या माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांचे एक पथक पुढील तपासासाठी पुण्यात दाखल झाले असून, पुणे पोलिसांच्या मदतीने कुटुंबाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून, बेपत्ता कुटुंबाचा लवकरात लवकर शोध लागावा यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.






