दीपक खिलारे
इंदापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत रविवारी (दि. 23) भेट घेतली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, उजनी पाणलोट क्षेत्रातील पूल व इतर विकास कामांसंदर्भात गडकरी यांच्याकडे विविध मागण्या सादर केल्या.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे इंदापूर तालुक्यात काही दिवसात आगमन होत आहे. तरीही या पालखी महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास हा अपूर्ण कामांमुळे अडचणीचा होणार असे दिसत आहे.
त्यामुळे वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालखी महामार्गाचे काम युद्धपातळीवरती करणे, तसेच पर्यायी व्यवस्था करणेसंदर्भात यावेळी चर्चा झाली. तसेच पालखी महामार्गाच्या कामांमध्ये गुणवत्तेचा दर्जा टिकवला जात नाही, अशा तक्रारी जनतेकडून होत आहेत, याबाबतही गडकरी यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची चर्चा केली.
तसेच उजनी जलाशयामध्ये नुकतीच बोट पलटी होऊन झालेल्या अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. करमाळा व इंदापूर तालुक्यात ये-जा करणेसाठी रस्त्याच्या मार्गाने तब्बल 80-90 किमीचा प्रवास करावा लागत आहे. मात्र, जलमार्गे हेच अंतर फक्त 4 किमी असल्याने बॅक वॉटर परिसरात पूल उभारण्याची मागणी होत आहे.
त्यासंदर्भात तातडीने सर्व्हेक्षण करून सर्व्हेनुसार योग्य ठिकाणी पूल उभारणीचे काम सुरु व्हावे, अशी मागणीही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली. दरम्यान, केलेल्या सर्व मागण्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करणेसंदर्भात सूचना दिल्याची माहिती देखील हर्षवर्धन पाटील यांनी दिली.