पुणे : हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाला तक्रारदारांकडून लाच घेतल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. शरद दशरथ कणसे असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांचा मुलगा यांचेविरुद्ध कलकत्ता ज्युडीशियल मॅजिस्ट्रेट यांनी वॉरंट काढले आहे. सदर वॉरंट बजावण्याचे काम हडपसर पोलीस स्टेशन येथील लोकसेवक शरद कणसे यांच्याकडे देण्यात आले होते. सदर वॉरंटमध्ये तक्रारदार व त्यांचा मुलगा यांना अटक न करण्यासाठी लोकसेवक शरद कणसे यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. या रकमेतील ५ हजार रुपये अगोदरच घेवून उर्वरित लाचेच्या रकमेसाठी तगादा लावला तसेच वारंवार अटक करण्याची धमकी देत होते, या बाबतची तक्रार तक्रारदार (पुरुष, वय ६४ वर्ष) यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता असता, लोकसेवक शरद कणसे यांनी तक्रारदार यांच्याकडून वरील कामासाठी उर्वरित २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन, लोकसेवक शरद कणसे यांनी तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारल्याचे उघड झाले. या प्रकरणी लोकसेवक शरद कणसे यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक शरद कणसे यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हां नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक अमोल भोसले करत आहेत.