न्हावरे,ता.२८: भांबर्डे (ता.शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी (ता.२८) रंगेहाथ अटक केली आहे.
निर्मला कैलास भुजबळ(वय-४४) असे साठ हजार रुपये लाच घेतलेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे.संबंधित ग्रामसेविकेवर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार यांनी सन२०२०-२१ या कालावधीमध्ये भांबर्डे ग्रामपंचायतीचे पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम केले होते.तसेच येथील अंगणवाडीचे बांधकामही केले होते.या कामांची बिले संबंधित तक्रारदाराला काढून देण्यासाठी ग्रामसेवक निर्मला भुजबळ यांनी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या सहा टक्के म्हणजेच साठ हजार रुपयांच्या लाचेची मागितली केली होती.तशी तक्रार तक्रारदार यांनी २७ मार्च रोजी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
त्यानुसार लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सोमवारी (ता.२८)भांबर्डे ग्रामपंचायत परिसरात सापळा रचून कारवाई केली.यामध्ये ग्रामसेवक निर्मला भुजबळ यांनी तक्रारदाराकडून भांबर्डे ग्रामपंचायत कार्यालयात साठ हजार रुपये लाच स्वीकारली.यावेळी ग्रामसेवक भुजबळ यांना लाचलुचपत विभागाने पंचांसमक्ष रंगेहाथ अटक करून कारवाई केली आहे.
संबंधित कारवाई पुणे लाचलुचपत विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.
भांबर्डे ग्रामपंचायतीमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे ग्रामसेविका निर्मला भुजबळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई झाली असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.त्यामुळे नक्की प्रकरण काय?याबाबत सर्वत्र दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.