यवत : कोरम अभावी तहकूब झालेली यवत ग्रामपंचायतची ग्रामसभा ३१ ऑगस्ट रोजी सरपंच समीर दोरगे यांच्या अध्यक्षतेखाली श्री. काळभैरवनाथ मंदिर येथे संपन्न झाली. ग्रामविकास अधिकारी बालाजी सरोदे यांनी कार्यक्रमाचा अजेंडा वाचून दाखवत ग्रामसभेला सुरुवात केली. स्वच्छ माझे अंगण या स्पर्धेचे बाबत उपस्थितीतांना मार्गदर्शन करत स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
तसेच घनकचरा प्रकल्प बाबत, ओला व सुका कचरा गोळा करणे, आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ मतदान नाव नोंदणी, ग्रामपंचायत हद्दीत हगणदरीमुक्त झालेल्या गावांमधे शाश्वत स्वच्छता कायम ठेवण्यासोबतच सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर अशा ( ओडीफ प्लस ), नल जल मित्र कार्यक्रमांतर्गत नळपाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्ती साठी ग्रामपंचायत निहाय मनुष्यबळाची निवड आदी विषयांबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
ग्रामसभेला महामार्ग प्रशासन, महसूल, विद्युत वितरण कंपनी, पोलीस प्रशासन, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग यांसह अनेक शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय यांना याबाबत पत्रव्यवहार करावा अशी मागणी केली. यावेळी यवतकरांना भेडसावत असलेल्या घनकचऱ्याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.
गावात कचरा गोळा करण्यासाठी फिरणारी घंटागाडी नागरिक कचरा घेऊन येण्यापूर्वीच निघून जात असल्याची तक्रार महिलांनी केली. विविध प्रकारचे सर्व्हे करण्यासाठी गावात व वाडी वस्तीवर जात परप्रांती यांच्या वतीने कोणतेही सहकार्य केले जात नाही. सध्या महिलांवर होणाऱ्या घटना पाहता आशा सेविकांना आवश्यक सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी विरजा तांबे यांनी केली. तर मातंग समाजातील बांधवांसाठी स्वतंत्र समाज मंदिर उभारावी अशी मागणी प्रवीण मोरे व काळूराम शेंडगे यांनी केली.
सीसीटीव्ही, महामार्ग, घंटागाडी, रोड रोमियो याबाबत नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत लवकरच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, मतदार नोंदणीसाठी नव मतदारांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा असे आवाहन सरपंच समीर दोरगे यांनी केले.
ओला व सुका कचरा नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायतीने आवश्यक त्या सुविधा पुरवावे अशी मागणी नागरिकांनी केली. तर घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी लवकरात लवकर उपायोजना कराव्यात यासाठी इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे असलेले जागा व स्मशानभूमी जवळील जागेचा प्रस्ताव सादर करावा. गावात अनेक परप्रांतीय नागरिक आले असून याबाबत आशा सेविकांच्या मार्फत सर्व्हे करून याची संपूर्ण माहिती ग्रामपंचायतकडे प्राप्त होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मतदार वाढवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने नोंदणी करू नये.
इम्रान तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य