पुणे: कात्रज येथील सुंदरनगर परिसरात मंगळवारी (दि. २९) मध्यरात्री गुंडांच्या टोळक्याने दोघा तरुणांवर हल्ला करून तेथील वाहनांचीही तोडफोड केली. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात सुमित मारुती पंडित (वय २७, रा. स्वामी समर्थ सदन, सुंदरनगर, कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश माळवे, यश घोडके व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सुंदरनगरमध्ये मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली.
सुमित, त्याचा भाऊ किरण आणि मित्र स्वप्नील हे रिक्षात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून तेथे आले. त्यापैकी दोघांच्या हातात लोखंडी कोयते होते. त्यांनी सुमितवर हल्ला केला. त्यानंतर या तिघांनी तेथे उभ्या केलेल्या रिक्षा व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. तेथून जवळच राहणाऱ्या किशोर कुचेकर, मल्लीनाथ मळवडे यांनाही या टोळक्याने मारहाण केली.
त्यानंतर त्यांनी वृंदावन सोसायटीजवळ उभ्या करण्यात आलेल्या सहा वाहनांच्या काचा फोडल्या. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर सहकारनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीवरून हे टोळके पसार झाले. त्यानंतर दोघांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे.