पुणे: केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पुणे-जोधपूर-पुणे दैनंदिन रेल्वे सेवेला मान्यता दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली. या रेल्वे सेवेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या घोषणेमुळे राजस्थानी समाज संघाच्या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. राजस्थानमधील खासदार पी.पी. चौधरी आणि गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या सेवेसाठी रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. २०४९५ आणि २०४९६ क्रमांकाची ही रेल्वे सेवा हडपसर येथून धावणार आहे.
लवकरच बुकिंग सुरू होणार
रेल्वेचे बुकिंग लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. राजस्थानी समाज संघाचे अध्यक्ष मगराज राठी यांनी मागणी मान्य केल्याबद्दल रेल्वे मंत्रालय आणि अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे. नवीन रेल्वे सेवेमुळे सध्या बसेसवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दैनंदिन रेल्वे सेवेला मंजुरी मिळाल्याने पुण्यातील राजस्थानी समुदायात आनंद साजरा केला जात आहे.