पुणे : पुण्यातील मंतरवाडी भागातील रंगाच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोडावूनमधील सर्व पेंट, वातानुकुलीन यंत्रणा, फर्निचर, संगणक आदि साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. त्याचबरोबर दोन टेम्पो आणि दोन दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
मंतरवाडी भागात गोदामाला आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाला मिळाली. १५ हजार ७०० स्क्वेअर फुट आणि अंदाजे दहा फुट भिंत असलेले गोदामातील रंगाच्या डब्यानी पेट घेतला होता. जवानांनी तातडीने आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा सुरु करून आतमध्ये कोणी नसल्याची खात्री केली. आगीवर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण मिळविले. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले होते.
या आगीमध्ये वाहने, औद्योगिक, घरगुती कामासाठी वापरला जाणारा रंगाला मोठी आग लागली होती. आगीच्या तीव्रतेने पत्र्याचे शेड मोठे लोखंडी गज वाकले गेले तसेच तेथील दोन टेम्पो आणि दोन दुचाकी वाहने जळून खाक झाले आहेत. गोडाऊनमधील रंग वातानुकूलित यंत्रणा, फर्निचर, संगणक आदी सामान पुर्णपणे जळाले असून मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नसून निपॉन कंपनीचे गोदाम असल्याची माहिती अग्नीशमन दलाने दिली आहे.