गणेश सुळ
केडगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या इतर मागासवर्गीय पात्र कुटुंबांनी मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले आहे.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. स्वतःचे घर नसलेल्या इतर मागासवर्गीय कुटुंबांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यासाठी घरकुल मंजुरीचे काम सुरू करण्यात आले आहे. योजनेच्या निकषानुसार ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःचे पक्के घर नाही, अशा लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे पक्के घर नसावे. लाभार्थ्याकडे घर बांधण्यासाठी स्वतःची पुरेशी जागा (२७० वर्ग फूट) उपलब्ध असावी. लाभार्थी हा इतर मागासवर्गीय ओबीसी किंवा एसबीसी या संवर्गातील असावा. त्याने इतर घरकुल योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याने ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज करावा. घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार बेघर, कच्च्या स्वरूपाचे घर, अपूर्ण घरात राहणारे लोक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित असलेले लोक यांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु या योजनेनुसार ज्यांना स्वतःची जागा उपलब्ध नाही, त्यासाठी आर्थिक मदत मिळेल का?
… तरच हक्काचे घर ही संकल्पना पूर्ण होईल!
मोदी आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना हक्काचे घर दिले जाणार, या संकल्पनेच्या आधारे अर्ज करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. परंतु त्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध असली पाहिजे ही अट शिथिल करून ज्यांना जागा उपलब्ध नाही, त्यांना ग्रामपंचायत स्तरावर गावठाण जागा उपलब्ध करून देण्यात यावी किंवा फॉरेस्टच्या जागेत घरकुलासाठी परवानगी मिळावी. तेव्हाच सर्वांना हक्काचे घर ही संकल्पना पूर्ण होईल. अन्यथा भूमिहीन नागरिक यापासून असेच वंचित राहतील.
– मक्खन बंड, भूमिहीन नागरिक