पुणे : डान्सर गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे राडा हे सूत्रच बनलं आहे. सबसे कातिल गौतमी पाटील… हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीमुळे बंदोबस्त लावून कार्यक्रम घेतले जात आहेत. ऑर्केस्ट्रा आणि डिजे डान्सर म्हणून चर्चेत असणारी गौतमी पाटील मोठ्या पडद्यावर देखील झळकली. आता गौतमी पाटील प्रथमच क्रिकेटच्या मैदानात थिरकली आहे. क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये तिने भन्नाट नृत्य केले आहे. पुणे जिल्ह्यात झालेला तिचा हा कार्यक्रम चाहत्यांची पसंती मिळवून गेला.
गौतमी पाटील यापूर्वी वाढदिवस, लग्नाचे रिसेप्शन यासारख्या कार्यक्रमांमध्ये नृत्य करताना दिसली. मात्र, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे क्रिकेटच्या मैदानावर गौतमी पाटील आली. तिने शिरूर प्रीमियर लीगमधील सामन्यांत नृत्य केले. या क्रिकेट प्रीमियर लीगच्या फायनल सामन्याच्या शेवटच्या दिवशी गौतमी पाटील हिला बोलावण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तिने नृत्य केले. प्रेक्षकांना क्रिकेटसोबत गौतमी पाटील हिच्या नृत्याचा आनंद मिळाला.
गौतमी पाटील हिचा क्रिकेट सामन्याच्या लीगमध्ये नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कॉमेंट येत आहे. क्रिकेट लीगमध्ये गौतमी पाटील हिला बोलवण्याची कल्पना अनेक नेटकऱ्यांना आवडली आहे. एकेकाळी ऑर्केस्ट्रामध्ये अदाकारा म्हणून काम करणारी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना सध्या तुफान गर्दी होत आहे. शावाय प्रचंड गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे.