लोणी काळभोर: पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ आणि सुंदर देश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच परिसर व नद्या स्वच्छ व्हाव्यात म्हणून करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहेत. एकीकडे स्वच्छतेच्या मोहिमेबाबत सरकारकडून जनजागृती केली जात आहे. मात्र, लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीपात्रात लोणी काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कचरा टाकते. मुळातच नदीपात्रात कचरा टाकणे हे चुकीचे आहे. आता तो कचरा जाळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विषारी वायू हवेत पसरल्याने एमआयटीत शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अथवा कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी कोणतीही यंत्रणा व स्वतंत्र कचरा डेपोही नाही. त्यामुळे लोणी काळभोर ग्रामपंचायत गावातील रोज सुमारे 8 ट्रॉली, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील 12 ट्रॉली, एमआयटी कॉलेज 5 ट्रॉली आणि इतर सामाजिक संस्थाकडून 8 ते 10 ट्रॉली कचरा हा मुळा-मुठा नदीपात्राजवळ आणून टाकला जात आहे. सुमारे 35 हून अधिक ट्रक्टर कचरा रोज मुळा-मुठा नदीपात्रात टाकला जात आहे.
मुळा-मुठा नदीपात्रात टाकलेल्या कचऱ्याला शुक्रवारी पाच जानेवारीला अज्ञात व्यक्तीने आग लावली. आग लावल्यानंतर कचऱ्याचा विषारी धूर संपूर्ण एमआयटी संकुलात पसरला. त्यामुळे येथे आग लागली की काय? असे वाटून एकच गोंधळ उडाला. दरम्यान, काही वेळानंतर समजले की, कचरा जाळण्यात आला आहे. त्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. मात्र, हा धूर नाका-तोंडात गेल्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना ठसका येऊन श्वास घेण्यास त्रास येत होता. त्यामुळे लाखो रुपयांची शैक्षणिक फी भरून एमआयटीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला सातत्याने आग लागण्याचा प्रकार घडत आहे. आग लागण्याचे कारण नैसर्गिक आहे की हेतुपुरस्सर आग लावण्याचा मानव निर्मित प्रयत्न होत आहे, याबाबत सविस्तर चौकशी करावी. तसेच यामधील दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना उद्भवू नयेत, यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पुर्व हवेलीत नदीकिनारी असणाऱ्या बहुतांशी ग्रामपंचायतींनी मुळा-मुठेला आपल्या हक्काचा कचरा डेपो बनवल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदी पुर्व हवेलीत गटारगंगा म्हणून वाहत आहे. परिणामी नदीतील जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आला असून अनेक जलचराच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर, नदीपात्रालगत असलेल्या पाणी पुरवठा संस्थेच्या कार्यक्षेत्रातील लाखो एकर शेतातील पिकांवर भयावह परिणाम दिसून येत असल्याने शेतकरी वेगळ्याच विवंचनेत अडकला आहे.
नदीपात्रात कचरा टाकणे हे चुकीचे आहे. त्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नदीपात्रातच जाळणे, हे अत्यंत गंभीर बाब आहे. चौकशीसाठी अधिकाऱ्यांना लवकरच घटनास्थळी पाठवत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलून दोषींवर कडक कारवाई करणार आहे.
विद्यासागर किल्लेदार (उपप्रादेशिक अधिकारी पुणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ)