पुणे : सोशल मीडियातून तरुणीशी ओळख करुन देण्याचे आमिष दाखवून तरुणाला निर्जनस्थळी बोलावत लूटमार केल्याची घटना घडली होती. ही घटना विश्रांतवाडीतील कस्तुरबा सोसायटीच्या पाठीमागे असलेल्या मैदानात १ फेब्रुवारी रोजी घडली होती. याबाबत एका २२ वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. अमन अजीज शेख (वय २२, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी), मजहर जुबेर खान (वय २४, रा. महाराष्ट्र हौसींग बोर्ड, नागपूर चाळ येरवडा), दीपक शांताराम कांबळे (वय २३, रा. जाधवनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुणाला फेसबुकवर मैत्रीची विनंती पाठविली. तरुणाशी आरोपींनी ओळख ओळख करून सेक्सकरिता मुलगी देतो असं आमिष दाखवून त्याला जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणाला विश्रांतवाडीतील कस्तुरबा सोसायटीच्या पाठीमागे असणार्या मैदानात मोकळ्या जागेत बोलवण्यात आले.
तरुणाला शिवीगाळ तसेच मारहाण केली. त्याचा मोबाइल हिसकावून घेत त्याच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ४३ हजार रुपये काढून घेतले. मोबाइल चोरून आरोपी पसार झाले. या घटनेनंतर तरुणाने पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तपास करत या जबरी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, संपत भोसले, संजय बादरे, संदीप देवकाते, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे, किशोर भुसारे, अनिल भारमळ, अक्षय चपटे यांनी केली.