पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. पाच जानेवारीला मोहोळचा खून झाला त्याच दिवशी गणेश मारणेचे नाव ‘रेकॉर्ड’वर आले होते. मात्र, पंधरा दिवस झाल्यानंतरही मारणेचा शोध सुरूच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
शरद मोहोळ खून प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि अन्य दोघांनी मोहोळवर गोळ्या झाडल्यानंतर ‘आम्ही गणेश मारणेची पोरे आहोत’ असे म्हणल्याचे या प्रकरणातील तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे खून झाल्याच्या पहिल्याच दिवशी गणेश मारणेचे नाव मोहोळ खून प्रकरणाशी जोडले गेले होते. मुळशी तालुक्यातील गुंड विठ्ठल शेलार याला मोहोळच्या खुनानंतर दुसऱ्याच दिवशी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्याचप्रमाणे गणेश मारणेचीदेखील चौकशी करण्यात येणार होती. परंतु, मारणे त्याचवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. त्यानंतर कोथरूड आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या घरीदेखील चौकशी केली. मात्र, तो सापडला नाही. त्यावेळी त्याचा फोनही बंद होता.
मोहोळ खून प्रकरणाच्या तपासाची सुत्रे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हातात घेतल्यानंतर मुख्य सूत्रधार मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हेच असल्याचे समोर आले. शरद मोहोळच्या खुनाच्या एक महिना आधी मुळशी येथे आरोपींची बैठक झाली होती. त्यामध्ये मोहोळच्या खुनाचा कट रचण्यात आला होता. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी विठ्ठल शेलार आणि त्याचा साथीदार रामदास मारणे याला अटक केली. त्यानंतरही गणेश मारणेचा तपास लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या प्रकरणात आतापर्यंत सोळा आरोपींना अटक केली आहे. विठ्ठल शेलार आणि वाघ्या मारणे वगळता उर्वरित आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
गणेश मारणे कोण आहे ?
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या गुन्हेगारी विश्वात गजानन मारणे आणि गणेश मारणे यांची नावे आघाडीवर होती. मारणे मूळचा मुळशी तालुक्यातील. तो पुण्यात एरंडवणे भागातील खिलारेवाडी येथे राहत होता. त्यादरम्यान या दोन्ही मारणेंच्या मागून येऊन बाबा बोडके टोळीची धुरा सांभाळणाऱ्या संदीप मोहोळने गुन्हेगारी विश्वात आपला दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी गणेश मारणे टोळीने कट रचला. ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर २००६ मध्ये पौड फाटा येथे संदीप मोहोळवर गोळ्या झाडून त्याचा खून केला होता. या प्रकरणात गणेश मारणे याची निर्दोष सुटका झाली, तर त्याच्या अन्य तिघा साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती.