इंदापूर : महायुती सरकारने 30 नोव्हेंबर 2023 रोजी शासन अध्यादेश काढून शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले व हजरत चांदशहावलीबाबा दर्गाह विकास आराखड्यास मंजुरी दिली. याचे खरे श्रेय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना जाते. त्यामुळे याचे श्रेय दुसऱ्याने घेऊ नये, अशी टीका आमदार भरणे यांचे नाव न घेता भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी केली.
भाग्यश्री बंगलो या ठिकाणी शुक्रवारी (दि.1) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ॲड. शरद जामदार हे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी नगरसेवक गोरख शिंदे, सुनील आरगडे, रोहीत पाटील, अमोलराजे इंगळे, दत्ता पांढरे, महादेव पांढरे, तुषार खराडे, प्रशांत गलांडे आणि असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.
ॲड. जामदार पुढे म्हणाले की, शिवप्रेमी व इंदापूरकर यांची गढी व दर्गाह विकास आराखड्याची असणाऱ्या मागणीला हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्यापासून केलेल्या सरकार दरबारातील पाठपुराव्यामुळेच वीरश्री मालोजीराजे भोसले गढी व चांदशहावलीबाबा दर्गाह संवर्धनासाठी महायुती सरकारकडून 37.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमध्ये सामील होण्याच्या अगोदरपासूनच हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या पाठपुरामुळेच हे यश प्राप्त झाले असून, निष्क्रिय तालुका प्रतिनिधींनी हे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असे त्यांनी सांगितले.
तसेच ”राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री गिरीश महाजन, माजी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा व यासाठी सक्रिय पाठपुरावा केला. आमचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे शिवप्रेमी शिवभक्त व इंदापूरकरांच्या वतीने आम्ही आभार मानतो”.
जामदार पुढे म्हणाले की, ‘हर्षवर्धन पाटील मंत्री असताना या गढीमधून चाललेला प्रशासकीय विभाग त्यांनी दुसऱ्या प्रशस्त प्रशासकीय भवनांमध्ये स्थलांतरित केला. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन व स्मारक व्हावे. इतिहासाची आठवण व्हावी या भूमिकेतून शिवप्रेमी, शिवभक्त परिवार व इंदापूरकरांनी मागणी केली. यातूनच भाग्यश्री बंगलो या ठिकाणी सर्व शिवभक्तांची मीटिंग झाली. यामध्ये विचारविनिमय होऊन वीरश्री मालोजीराजे गढी संवर्धनाची चर्चा झाली’.