पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील पळून गेलेल्या आरोपीच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हिट अँड रन प्रकरण झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. आयुष प्रदीप तयाल (वय 34) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. हडपसर येथे राहणाऱ्या या आरोपीने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता.
कसा झाला अपघात?
कोरेगाव पार्क परिसरात रात्री 1.30 ते 1.35 वा सुमारास एबीसी रोड कडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर MH12 NE 4464 कारचालकाने प्रथम ऍक्टिवावरील तिघांना धडक दिली. त्यात ते तिघांना किरकोळ मार लागला. त्यानंतर पुढे जाऊन दुचाकीस्वार रुउफ अकबर शेख याला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या रुउफ याला नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल कऱण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
असा सापडला आरोपी..
आरोपीने घटनास्थळावरून पळ काढल्याने पोलिसांनी तात्काळ आपली सूत्रे हलवून त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे कारचा शोध घेण्यात आला. सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून धडक देणाऱ्या भरधाव कारचा वाहन क्रमांक मिळवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डिंग समोर मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता. कारने एका दुचाकीस्वाराला जोरात धडक दिली. कार चालकाच्या शेजारी बसलेली व्यक्ती ही सिगारेट फुंकत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतरही आरोपीने पळ काढला.