लोणी काळभोर: पूर्व हवेलीतील बडा इंधन माफिया तुरुंगाच्या बाहेर येताच हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन व दौंड तालुक्यातील यवत, खडकी आणि भिगवण परिसरात इंधन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाणे ग्रामीणमध्ये असताना पोलीस इंधन माफियांना पाठीशी घालत होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा समावेश शहर आयुक्तालयात झाला आहे. मात्र, परिस्थिती बदलेली नाही. शहर पोलीससुद्धा इंधन माफियांना पाठीशी घालत असल्याचे समोर येत आहे. यामुळे इंधन माफियांचे चांगलेच फावले असून त्यांनी पोलिसांना हाताशी धरून प्रचंड माया गोळा केली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील रावणगाव, खडकी (ता. दौंड) परिसरात रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या एका टँकरमधून इंधन माफिया डिझेल चोरी करतानाचा व्हिडिओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला आहे. या व्हिडिओत टँकरमधून दोघेजण बिनधास्तपणे डिझेल चोरी करताना आढळून आले. यामुळे इंधन माफिया आता फक्त हवेलीत नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात सक्रीय झाल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
दरम्यान, आळंदी म्हातोबाची हद्दीतील डोंगरात २५ जुलैला एचपी कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडत त्यातून इंधन चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. या इंधन चोरी प्रकरणात लोणी काळभोर पोलिसांनी बड्या इंधन माफियासह सहा जणांना अटक केली. मात्र, हा बडा इंधन माफिया तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा पूर्व हवेलीतील हडपसर, लोणी काळभोर, यवतसह दौंड भागात ‘अॅक्टिव्ह ‘ झाला असून, त्यांनी आता वाहनांमधील इंधन चोरी करण्यास सुरुवात केली. याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी पोलिसांचे मात्र, ‘हाताची घडी तोंडावर बोट’ हे धोरण असल्याने इंधन माफियांना जणू मोकळे रानच मिळाले आहे.
इंधन माफियांवर कारवाई का नाही?; नागरिकांचा प्रश्न
आपापल्या हद्दीतील अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले असले तरी, अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मानसिकता दिसून येत नाही. जिल्ह्यात सध्या इंधन माफिया राजरोसपणे इंधन चोरी करत आहे. पोलीस इंधन माफियांवर कारवाई का करत नाही? अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात? पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी ‘हाताची घडी तोंडावर बोट’ हे धोरण स्वीकारले आहे का? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.