पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार लाल रंग असलेल्या व्हिलच्या स्कुटीमुळे पोलिसांच्या तावडीत सापडला. सीसीटिव्ही फुटेजच्या पाहणीत दिसणारी लाल रंगाच्या व्हिलची स्कुटी परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळल्याने संशयावरून पोलिसांनी सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून २९,०३,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाने ही उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
याप्रकरणी आमिर शब्बीर शेख (वय २५, सध्या रा. निगडी प्राधिकरण, ता. हवेली, मूळ गाव- वडेश्वर काटे, वडगाव मावळ, पुणे) याला अटक केले आहे. नितीन शहाजी कर्षे (वय ३४ वर्ष, रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) यांनी २५ डिसेंबर २०२३ रोजी ५ वाजण्याच्या सुमारास मोई गावच्या हद्दीत, इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाशेजारी, मोई निघोजे रस्त्यालगत (ता. खेड, जि. पुणे) फिर्यादीच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने पाठीमागील बाजूने जिन्याजवळील खिडकीच्या लोखंडी ग्रिलचे बार कापून आत प्रवेश केला. घरातील सहा बेडरुममधील लाकडी कपाटे उचकटून त्यातील ४७.८ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, मिनी गंठण, राणीहार, चेन, अंगठ्या, कर्णफुले जोड, बांगडया, ब्रेसलेट, कडे व रोख रक्कम ५,१५,००० लाख रुपये असा एकूण ३० लाख ४८ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करुन पळवून नेला.
याबाबतची तक्रार दिल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू होता. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुशंगाने मोई, निघोजे, कुरुळी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना चिंबळी फाटा ते कुरुळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डोंगरवस्ती येथे एक व्यक्ती लाल रंग असलेल्या व्हिलच्या स्कुटीवर २ जानेवारी २०२४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संशयितरित्या फिरताना आढळली. तपास पथकातील अंमलदारांनी संबंधित व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो स्कुटी घेवून पळून जावू लागला. पाठलाग करुन पोलिसांनी त्याला पकडले. तपास केला असता, हा गुन्हा केल्याचे त्याने कबुल केले. त्याच्याकडून सोने, रोख रक्कम व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.