लोणी काळभोर : पुण्यातील आर्म्स फोर्स मेडिकल कॉलेजच्यावतीने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशालेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात तब्बल २०० हून अधिक मुलींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिराची सुरुवात विद्यार्थिनींच्या बहारदार नृत्याने झाली. या शिबिरात मुख्यतः उंची, वजन, डोळे, कान, दात, व्यक्तिगत स्वच्छता व मासिक स्वच्छता इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. या वेळी पुणे आर्म्स फोर्स मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्या कर्नल अरुणा के. आर., लेफ्टनंट कर्नल तनुजा जदली, लेफ्टनंट कर्नल डोला बॅनर्जी, मेजर ज्योती, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात सहा स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये संतुलित आहार, व्यक्तिगत स्वच्छता, डेंग्यूपासून सुरक्षा, मासिक स्वच्छता, मोबाइलचे हानिकारक प्रभाव आणि फर्स्ट एड बॉक्स यांची माहिती फलकावर लावण्यात आली होती. तसेच प्रत्येक स्टॉलमध्ये विद्यार्थिनींनी सविस्तर माहिती दिली. तसेच आर्म्स फोर्स मेडिकल कॉलेजच्या ३१ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. यावेळी कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी निरोगी आरोग्याचा निर्धार केला आहे. तर या कार्यक्रमासाठी आर्म्स फोर्स मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य ब्रिगेडियर डॉ. एस. गीता यांचे विशेष सहकार्य मिळाले.
या वेळी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके उप मुख्याध्यापक दिलीपकुमार सूर्यवंशी, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभाग प्रमुख रामदास मेमाणे, शिक्षक पांडुरंग पाटील, सतीश कदम, प्रियांका पाटील, उषा चौधरी, मोहन वीरकर, मीरा किलचे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आर्म्स फोर्स मेडिकल महाविद्यालयात अर्थात सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींनी मागील दोन आठवड्यांमध्ये लोणी काळभोर गावातील नागरिकांच्या समस्यांचे सर्वेक्षण केले. आयुष्यमान भारत योजनेबद्दल जागृती निर्माण करून त्यांना कार्ड बनविण्यास प्रोत्साहन दिले.