Fraud | पुणे : नामांकित डॉक्टरांची पत्नी बोलत असल्याचं सांगून एका औषध विक्रेत्याला अज्ञात व्यक्तीने दहा हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
याबाबत मुकेश वालचंद जैन (रा. लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील लेक टाऊन येथे जैन यांचे एम जे. सर्जीकल मेडीकल असून त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एका महिलने संपर्क साधला. आपण डॉ. जोशी यांची पत्नी बोलत असल्याचे महिलेने सांगितले. कंबरेचा पट्टा आणि वॉकर सातारा रस्त्यावरील रुग्णालयात पाठवून द्या असं त्या महिलेने सांगितले. माझ्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहे. त्याबदल्यात तुम्ही मला पाचशे रुपयांच्या नोटा द्या, असे महिलेने सांगितले.
त्यानंतर जैन यांनी आपला कामगार रवींद्रकुमार याला कंबरपट्टा, वॉकर आणि दहा हजार रुपये घेऊन रुग्णालयाच्या परिसरात पाठविले. त्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात एकजण रवींद्रकुमार यांना भेटला. डॉ. जोशी यांच्या पत्नीने मला पाठविले आहे. तुमच्याकडील दहा हजार रुपयांची रोकड मला द्या. मी मॅडमकडून पैसे घेऊन येतो, असे सांगून त्याने रवींद्रकुमार याच्याकडून दहा हजार रुपये घेतले.
दरम्यान, बराच वेळ झाला तरी पैसे घेऊन गेलेला आरोपी परत आला नाही. तेव्हा रवींद्रकुमार रुग्णालयात गेला. तेव्हा पैसे घेऊन गेलेली व्यक्ती पसार झाल्याचे उघडकीस आले. पोलीस अधिक तपास करत आहेत.