पुणे : पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र सुरु असून चोरट्यांनी एकाच दिवसात पुण्यातील 9 जणांची तब्बल 3 कोटी 35 लाख 3 हजार 177 रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी, चंदननगर, हडपसर, सहकारनगर तसेच संबंधित पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयात 34 पोलीस ठाणे आहेत. यापैकी 8 पोलीस ठाण्यात बुधवारी एकाच दिवशी 3 कोटी 35 लाख 3 हजार 177 रुपयांच्या फसवणुकीचे 9 गुन्हे दाखल झाले आहे. दरम्यान, हे गुन्हे नोंदवले जात असले तरी त्याचा तपास मात्र, रेंगाळतच सुरू आहे. कुशल मनुष्यबळासोबतच तांत्रिक यंत्रणेच्या अभावामुळे पोलिसांना या गुन्ह्यांचा तपास करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. दुसरीकडे सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृतीचा अभाव दिसत आहे.
दरम्यान, वेगवेगळ्या प्रकरणात सायबर चोरट्यांनी पुणेकरांची फसवणूक केली आहे. त्यामध्ये इंडिया फायनान्स अॅथोरिटीकडून बोलत असल्याचे सांगितले आणि इंन्शुरन्स फंड जमा करण्याच्या बहाण्याने 65 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीस 23 लाख 53 हजार रुपयांना फसविले आहे. तसेच दुसऱ्या घटनेत शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन चांगला परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणाला 34 लाख 69 हजार रुपयांना गंडा घातला आहे. याबरोबरच तिसऱ्या फसवणुकीमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घातला आहे. तर गॅसचे बिल अपडेट करा, नाही तर गॅस पुरवठा खंडीत केला जाईल, असे सांगून एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे.
यासह वेगवेगळ्या प्रकरणात सायबर चोरट्यांनी पुणेकरांनी फसवले आहे.