पुणे : दिवाळी सणानिमित्त पुण्यातील मध्यवर्ती भागात खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेता वाहतूक पोलिसांनी मध्यभागात चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मध्यभागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून उपाययोजना करण्यात आल्या असून, सोमवारपासून (२१ नोव्हेंबर) ते ५ नोव्हेंबरपर्यंत हा बदल लागू राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.
मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, मंडई, शनिपार, तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. अनेकजण मोटारी घेऊन मध्यभागात खरेदीसाठी येतात, अरुंद रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावली जातात. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या इतर नागरिकांना रस्त्यावरून चालणेदेखील कठीण होते.
या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून हे बदल पाच नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
असे असतील वाहतूकीत बदल
- छत्रपती शिवाजी रस्त्यावर येणाऱ्या चारचाकी वाहनांनी स. गो. यर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) वळून जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.
- स्वारगेटकडून बाजीराव रस्त्याने येणाऱ्या चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
- चारचाकी वाहनांनी टिळक रस्त्यावरील पुरम चौकातून डावीकडे वळून टिळक रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
- अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद ठेवण्यात येईल. वाहनचालकांनी बाजीराव रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.
- फुटका बुरुज चौकातून जोगेश्वरी मंदिराकडे येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद केली जाणार आहे.
- शनिपार चौकातून मंडईकडे जाणारी वाहतूक, कुमठेकर रस्त्यावरून मंडईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.