लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोरच्या इंधन माफियांनी मागील काही दिवसांपासून इंधन चोरी बरोबरच नगर व सोलापूर जिल्ह्यातील एटीएमवर डल्ला मारण्यास सुरुवात केली असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. लोणी काळभोर येथील इंधनमाफीयांना नगर जिल्ह्यातील सुपा पोलिसांनी भारतीय स्टेट बँकेचे एटीएमवर दरोडा टाकल्याप्रकरणी रविवारी (ता. ०७) दोघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात लोणी काळभोरचा ‘बडा’ इंधन माफिया सहभागी असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली असून वरील टोळीकडून नगर जिल्ह्यातील ए.टी.एम चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे.
दत्तात्रय विठ्ठल विरकर, अनंतकुमार नवनाथ गाडे (रा. दोघेही, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर इसाक मचकुरी व चौथा अनोळखी आरोपी असे फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपा गावाच्या हद्दीत पोलीस रविवारी मध्यरात्री (ता.७) दीड वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना, सुपा-पारनेर रस्त्यावर शहाजापूर चौकातील मळगंगा इमारतीत भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशिन अज्ञात चोरटे फोडत आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्याच्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पोलिसांना आरोपी दत्तात्रय विरकर व अनंतकुमार गाडे हे एटीएम मशिन फोडत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गॅस कटर, पक्कड, स्प्रिंग पक्कड, गॅस सिलेंडर, स्प्रे, इत्यादी साहित्य जप्त केले.
आरोपी इसाक मचकुरी व त्याचा चौथा अनोळखी साथीदार यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच, घटनास्थळावरून लाल रंगाच्या स्विफ्ट कार मध्ये बसून पळुन गेले. आरोपी इसाक मचकुरी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ३ तर विमानगर पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल आहे. सुपा पोलीस दोन्ही फरारी आरोपींच्या मागावर आहेत. पुढील तपास सहाय्यक फौजदार रियाज पटेल करीत आहेत.
दरम्यान, लोणी काळभोरचे इंधनमाफिया दरोडेखोर बनले असून इंधनमाफिया व त्यांचे सहकारी पोलिसांच्या दृष्टीने आव्हान बनले आहेत. नगर पोलिसांच्या बरोबर पुणे व सोलापूर पोलिसांनी आपआपल्या हद्दीतील एटीएम चोरीत लोणी काळभोरचे इंधन माफिया सहभागी आहेत का? याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सदर कामगिरी नगरचे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, सहाय्यक फौजदार रियाज पटेल, पोलीस अंमलदार रमेश शिंदे, भरत इंगळे व राहुल हिंगसे यांच्या पथकाने केली आहे.