पुणे : शहरात चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरात घरफोडीच्या चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरांनी २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पहिल्या घटनेत विकासकुमार विजयकुमार गुप्ता (वय ४३, रा. घोरपडी) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या गोदामामध्ये प्रवेश करून चोरांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास १ लाख २७ हजार रुपये किमतीचे सामान चोरून नेले आहे.
दुसऱ्या घटनेत सिंहगड परिसरात राहणाऱ्या २८ वर्षांच्या तरुणीने पोलिसांना तक्रार दिली आहे. अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या बेडरूममध्ये प्रवेश करून ६२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. तर तिसऱ्या घटनेत सत्यदेव रामधणी तिवारी (३५, रा. कोंढवा बुद्रुक) यांच्या दुकानात ठेवलेले ४३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेले. तर चौथ्या घटनेमध्ये विमाननगर परिसरात राहणाऱ्या ५० वर्षांच्या महिलेच्या राहत्या घरात प्रवेश करून, घरातील टीव्ही, म्युजिक सिस्टम, गॅस शेगडी आणि सीसीटीव्ही फुटेजचा डीसीआर असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनांचा अधिक तपास पोलीस करत आहेत.