-दीपक खिलारे
इंदापूर : भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश शरद पवारांसाठी डोकेदुःखी ठरण्याची शक्यता आहे. कारण, हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रवादीतील इंदापूरच्या काही नेत्यांनी स्पष्ट विरोध केला असून आता इंदापूरमध्ये ज्याजागी शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश झाला, त्याच जागेवर (शुक्रवारी दि.11 ) रोजी मेळाव्याचं आयोजन करत तालुक्यात तिसरी आघाडी तयार करुन पाटील यांना कडवे आव्हान देण्याचे सुतोवाच युवा नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी पत्रकार परिषदेत केले.
इंदापूर येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात माजी मंत्री यांचा शरदचंद्र पवार गटात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. या पक्ष प्रवेशास विरोध दर्शवत पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने व कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन भरत शहा या शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी शहरातील सोनाई पॅलेस याठिकाणी पत्रकार परिषदेत तिसरी आघाडीची संकल्पना स्पष्ट केली.
प्रवीण माने म्हणाले की, पक्षात मी आणि अप्पासाहेब जगदाळेंसह अनेकजण आगामी विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक होतो. याबाबत, आम्ही साहेबांना देखील सांगितले होते की, जे पक्षात आहेत त्यांना उमेदवारी द्या. मात्र, आज इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश झाला, त्यांची उमेदवारी देखील जाहीर झाली. त्यामुळे, कार्यकर्त्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे, तिसरी आघाडी पर्याय द्यावा अशी कार्यकत्यांची मागणी आहे. लोकांना तिसरा पर्याय दिला पाहिजे, त्यामुळे आम्ही जनतेच्या कोर्टात जाणार असल्याचे सांगितले.
अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, मीच उमेदवार म्हणून हे सगळं चाललं होतं, अन्याय किती असावा? 2014 ला मला असेच आश्वासन दिले होते. 2019 ला आम्ही निर्णय घेतला, आज ज्यांचा पक्षप्रवेश झाला त्यांनी मला मोहिते पाटील यांच्या घरी बोलावून शब्द दिला आणि सांगितले होते की, 2024 ला तुम्हीच. त्यामुळे, आता जनता हसायला लागली आहे. माझ्यावर आणि प्रवीण मानेंवर ! आमच्या वर अन्याय झाला असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.
आम्ही लोकसभेला काम केलं, आता लोकांना विचारून काम करू. आज लोकं म्हणतात आजी- माजी नको तरी पण त्यांनाच बोलावून घेतात. आजपर्यंत कधी कुणाकडून रुपया घेतला नाही तरी माझ्यावर अन्याय का? किती दिवस अन्याय सहन करायचा? असा सवालही अप्पासाहेब जगदाळे यांनी उपस्थित केला.
भरत शहा म्हणाले की, मी कार्यक्रमाला येणार नव्हतोच, मी ताईंना आधीच सांगितले होतं, ताईंना सदिच्छा भेट दिली. आम्हाला वेगळा पर्याय शोधायचा होता, पण तोच पर्याय पुढं आल्याने आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असे भरत शहा यांनी म्हटले.
या आयोजित पत्रकार परिषदेत सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, विकास खिलारे यांसह शरदचंद्र पवार गटाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.