दीपक खिलारे
इंदापूर : शिवसेना-भाजप सरकारने लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या विविध कामांची निविदा (टेंडर) प्रक्रिया शुक्रवार, दि. ३० डिसेंबर २२ पासून सुरु केली आहे. त्यामुळे योजनेचा मार्ग आता सुकर झाला आहे. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी योजनेकरीता रु. २१८.७९ कोटी रक्कमेची निविदा काढल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व जलसंपदा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शनिवारी (दि.३१) आभार व्यक्त केले.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सन १९९५ ते १९९९ मध्ये युती शासनामध्ये मंत्री असताना कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या सूचनेनुसार लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचा प्रस्ताव हा शासन दरबारी मांडला व त्यानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने दि.१३/७/१९९८ रोजी ‘ इंदापूर सिंचन योजना ‘ या नावाने योजनेचा आराखडा जलसंपदा विभागाने तयार केला.
योजनेची प्रक्रिया सुरू राहत सन २००४ मध्ये योजनेस तत्व:ता मंजूरी मिळाली, तर २००७ मध्ये प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर या योजनेसाठी हर्षवर्धन पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा व शासनस्तरावर बैठका झाल्या.
सन २०१२ मध्ये या योजनेसाठी उजनी धरण पाणी वापर आराखड्यामध्ये ०.८६ टी.एम.सी. पाणी आरक्षित ठेवण्यात आले. या योजनेत इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे ७२५० हेक्टर क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये इंदापूर तालुक्यातील सुमारे ४३३७ हेक्टर तर बारामती तालुक्यातील सुमारे २९१३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी, शेटफळगढे, शिंदेवाडी, म्हसोबाचीवाडी, काझड, लाकडी, निंबोडी, निरगुडे, पिंपळे, अकोले तर बारामती तालुक्यातील जैनवाडी, पारवडी, रुई, सावळ, वंजारवाडी, कण्हेरी,जळोची या गावांचा समावेश आहे.
दरम्यान, लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भक्कम सहकार्यातून तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
हर्षवर्धन पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा…!
सदरची योजना मार्गी लागावी यासाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सतत पाठपुरावा करीत होते. हर्षवर्धन पाटील यांनी निरगुडे येथे दि. ७/१०/२२ रोजी हनुमंतराव काजळे यांचे पुढाकाराने आयोजित शेतकरी मेळाव्यात लाकडी-निंबोडी योजना शिवसेना-भाजप सरकार निश्चितपणे मार्गी लागेल, अशी ग्वाही दिली होती.
तसेच हर्षवर्धन पाटील यांनी लाकडी निंबोडी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची अडचणी मार्गी लावण्यासाठी पुणे येथे सिंचन भवन येथे जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर दि.१५ ऑक्टोबर २२ रोजी बैठक घेतली होती. अखेर हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांना यश येऊन योजनेसाठी पंपगृह टप्पा १ व २, वितरण कुंड १ व २, बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे बांधकाम आदी विविध कामांसाठी रु. २१८.७९ कोटी रक्कमेची निविदा काढण्यात आली आहे.
लाकडी-निंबोडी योजनेस शंकररावजी पाटील यांचे नाव…!
कर्मयोगी शंकररावजी पाटील हे ऋषितुल्य असे नेतृत्व आहे. सदरची योजना व्हावी हे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे या योजनेस ” कर्मयोगी शंकररावजी पाटील उपसा जलसिंचन योजना ” असे नाव देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.